१९ वर्षांनंतरची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ची गाठ : कृषी पदविका २००४-०६ बॅचचा स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- जिल्ह्यातील आरमोरी येथील श्रीमती अंबाबाई खोब्रागडे कृषी प्रशिक्षण संस्थेच्या २००४ ते २००६ या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल १९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देणारा स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
१८ मे २०२५ रोजी, रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत आरमोरी येथील मधुबन हॉटेलमध्ये हा ‘गेट-टुगेदर’ पार पडला. विशेष म्हणजे गोंदिया, नागपूर, ब्रम्हपुरी, अर्जुनी मोरगाव, लाखांदूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथून मैत्रिणींनी लांबचा प्रवास करून कार्यक्रमात सहभाग घेतला.
२००६ मध्ये कृषी पदविका पूर्ण झाल्यानंतर सर्वजण आपापल्या मार्गाने व्यस्त झाले. काही मित्र गावातील लग्न समारंभात भेटायचे, पण संवाद कमी झाला होता. अनुपमा जनबंधू हिने वर्गाच्या WhatsApp ग्रुपची कल्पना मांडली आणि त्यातून ३५-३६ जुन्या सहाध्याय पुन्हा एका मंचावर आले. गेली १० वर्षे हा ग्रुप सक्रिय आहे.
या स्नेहमिलन कार्यक्रमात अरविंद शेंडे यांनी “एक ना एक दिन राणी बनेगी…” हे गीत सादर करून मैफिल रंगवली. सर्वांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला आणि आपल्या जुन्या कॉलेजला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यात आशिष नंदनवार व अनु जैनबंधू यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्याच पुढाकारामुळे हा सुंदर सोहळा घडून आला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मित्रमैत्रिणींनी परस्परांना भेटून पुन्हा एकत्र येण्याचा निर्धार केला.


