– मोनिका मडावीची राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड; कबड्डी व व्हॉलीबॉलमध्येही झळकले गडचिरोलीचे खेळाडू
लोकवृत्त न्यूज
हेडरी, दि.२० मे : गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात नवे संधीचं व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन’च्या खेळाडूंनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवत मोठे यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य ज्युनियर (अंडर-२०) ओपन अॅथलेटिक्स स्पर्धा-२०२५ मध्ये एटापल्ली येथील मोनिका सन्नू मडावी हिने हाय जंपमध्ये दुसरा क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर १८ व १९ मे रोजी ही स्पर्धा झाली.
या स्पर्धेत लॉयड्सच्या क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेणाऱ्या यश पांढेकर यानेही १०,००० मीटर धावण्याच्या शर्यतीत चौथा क्रमांक पटकावून आपली कामगिरी ठळकपणे अधोरेखित केली.
दरम्यान, विदर्भ राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्यातून आठ खेळाडूंची निवड झाली असून ही मुले व मुली लॉयड्स क्रीडा संकुलातील आहेत. उमरी (अकोला) येथील जगदंबा स्पोर्टिंग क्लबमध्ये झालेल्या निवड चाचण्यांमध्ये त्यांनी आपली चमक दाखवली.
राज्य शिबिरासाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पायल तलांडी, समीरा गोटा (उडेरा), विद्या गावडे, अमोल वारसे (तुमरगुंडा), आशा नरोटी (वांगेतुरी), सपना पुंगाटी (मरकल), महाश कुडे आणि स्वतंत्र आडे (कोनसारी) यांचा समावेश आहे. हे राज्य शिबिर २२ मे रोजी गडचिरोली येथे होणार आहे.
याआधी, जानेवारी महिन्यात रामकृष्णपूर येथील सुजिता बिश्वास हिने नागपूरमध्ये झालेल्या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या १८ वर्षांखालील स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड मिळवली होती.
या सर्व यशामागे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रयत्नांतून गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राला नवी दिशा लाभत आहे.
लॉयड्सच्या प्रशिक्षणसंस्थेने ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलेली ही क्रीडास्फूर्ती निश्चितच प्रेरणादायक आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #GADCHIROLI POLICE #Maharashtra #Surjagarh
#Lloyds Infinit Foundation )

