गडचिरोलीत रानटी हत्तींचा धाडसी कहर : शहरात सकाळीच थरार – नागरिकांत भीतीचा वातावरण

504

गडचिरोलीत रानटी हत्तींचा धाडसी कहर : शहरात सकाळीच थरार – नागरिकांत भीतीचा वातावरण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली,दि. २५ मे :- नक्षलग्रस्त आणि जंगलबहुल असलेल्या गडचिरोली जिल्ह्याला आता रानटी हत्तींच्या धडकीने हादरवले आहे. आज पहाटेच्या सुमारास दोन मादींपासून विभक्त झालेले टस्कर हत्ती थेट गडचिरोली शहरात शिरले आणि इंदिरानगर, लांझेडा, रामनगर व रेड्डी गोडाऊन चौकात काही तास मुक्त संचार करत थरार उडवून दिला. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून ही घटना जिल्हा प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २०१८ पासून ओडिशा-छत्तीसगड सीमावर्ती जंगलातून हत्तींच्या कळपाने प्रवेश सुरू झाला आहे. अनेकवेळा त्यांनी शेती आणि पिकांचे नुकसान केले असून काही ठिकाणी मानवी हानीही झाली आहे. मात्र, शहरात हत्तींचा असा उघडपणे वावर ही पहिलीच वेळ असून वनविभागाच्या यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आज सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांनी हे हत्ती पाहिल्यानंतर त्यांची एकच धावपळ उडाली. काहींनी हे थरारक दृश्य मोबाईलमध्ये कैद केले असून सोशल मीडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
वनविभागाच्या माहितीनुसार सदर हत्ती गुरवळा जंगलात गेले असले तरी त्यांच्या पुनरागमनाचा धोका कायम आहे. सध्या वनविभाग आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे.
वन्यजीवांच्या वावरामुळे आता गडचिरोली शहरही धोक्याच्या झोनमध्ये? हत्तींच्या हल्ल्याचा धोका आणि नागरिकांची असुरक्षितता ही नव्या संकटाची चाहूल देत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #forestdepartment @वन विभाग )