सोनापूरमध्ये वैरणीवर युरिया प्रक्रिया : कृषी विद्यार्थ्यांचा उपयुक्त प्रयोग

106

सोनापूरमध्ये वैरणीवर युरिया प्रक्रिया : कृषी विद्यार्थ्यांचा उपयुक्त प्रयोग

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, ता. १३ जून :-सोनापूर (अवताडे) गावात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनावरांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरणारी युरिया प्रक्रिया करून एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. जनावरांचे आरोग्य सुदृढ राहावे, त्यांच्या शरीराची वाढ समाधानकारक व्हावी आणि चांगले उत्पादन मिळावे, यासाठी वैरणीवर युरिया प्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी दिले.
कोरडवाहू भागात वाळविलेल्या वैरणीचा पोषणमूल्ययुक्त वापर करणे ही एक मोठी गरज असते. युरिया प्रक्रिया केल्यास ही वैरण पचण्याजोगी होते आणि प्रथिनांचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य टिकते व दूध उत्पादनात वाढ होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.
सदर उपक्रम हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमात प्रलय झाडे, छबील दूधबळे, पवन बुधबावरे, उषा गजभिये व श्रीकांत सरदारे यांचे सहकार्य लाभले.
या प्रयोगात कृषीविद्यार्थिनी वैधवी खोंडे, आचल हेडाऊ, स्वाती लेनगूरे, उत्कर्षा गाडगे व आकांक्षा लिचडे यांनी पुढाकार घेतला.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, अशा उपयुक्त माहितीच्या प्रसाराची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यामुळे आधुनिक व शास्त्रशुद्ध कृषिपद्धती गावपातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.