Home गडचिरोली गडचिरोलीत शिक्षकेतर पदभरतीसाठी आंदोलन पेटलं; शासनाच्या पत्रकाचा तीव्र निषेध

गडचिरोलीत शिक्षकेतर पदभरतीसाठी आंदोलन पेटलं; शासनाच्या पत्रकाचा तीव्र निषेध

264

गडचिरोलीत शिक्षकेतर पदभरतीसाठी आंदोलन पेटलं; शासनाच्या पत्रकाचा तीव्र निषेध

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, प्रतिनिधी :- शालेय शिक्षण विभागाच्या दिरंगाईमुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती प्रक्रिया ठप्प झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर सेवक संघटना गडचिरोलीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी २८ मे २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रकाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
या पत्रकानुसार २०२३-२४ या वर्षासाठी मंजूर संचमान्यतेनुसार पदभरती न करता २०२४-२५ ची संचमान्यता मिळाल्यानंतरच भरतीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपूनही संचमान्यता प्रक्रिया रखडल्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत असून, त्यामुळे शाळांतील दैनंदिन व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अन्यायकारक असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर गदा आणणारी आहे, असा आरोप संघटनेने केला.
आंदोलनकर्त्यांनी शिक्षण संचालकांचे पत्रक त्वरित रद्द करून शिक्षकेतर पदभरती सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच, २४ वर्षांचा दुसरा लाभ, बक्षी समितीच्या शिफारशीप्रमाणे आश्वासित प्रगती योजना, शिक्षक पदावर पदोन्नती आणि चतुर्थ श्रेणी पदांची कायमस्वरूपी भरती या प्रमुख मागण्याही निवेदनाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हा कार्यवाह उदय धकाते, अध्यक्ष अशोक काचीनवार यांच्यासह शैलेश कापकर, नंदलाल लाडे, हेमंत रामटेके, अरुण धोडरे, भूपेश वैरागडे, फैजान पठाण आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेने इशारा दिला आहे की, जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Don`t copy text!