गडचिरोली जिल्ह्यात वाहनचोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद – ४२ दुचाकी जप्त

135

६ लाख रुपयांच्या वाहनचोरीचा पर्दाफाश, बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्रीचा धक्कादायक खुलासा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गडचिरोली जिल्ह्यात आणि सीमावर्ती भागात वाहनचोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसवित, गडचिरोली पोलीस दलाने एका आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करत एकूण १६.०५ लाख रुपये किंमतीच्या ४२ चोरीच्या दुचाकी वाहने हस्तगत केली आहेत. या कारवाईत गडचिरोली व छत्तीसगड राज्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष तपास मोहिमेंतर्गत, पोलीस मदत केंद्र सावरगाव येथे दाखल गुन्हा क्रमांक १७/२०२५ च्या अनुषंगाने ही धडक कारवाई करण्यात आली.
प्राथमिक तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, विनयप्रकाश धरमु कुजुर (रा. गजामेंढी, ता. धानोरा) याला राजनांदगाव कारागृहातून ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने वाहनचोरी व बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याची कबुली दिली.
तपास अधिक खोलवर गेल्यानंतर, आरोपीने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत मिळून अनेक वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. या टोळीत सामील इतर आरोपींमध्ये रवनू दसरु पदा, राकेश छबीलाल बादले, रामु झिकटुराम धुर्वे (वरील तीनही रा. गजामेंढी, ता. धानोरा), संजय मुन्ना लकडा, राजेंद्र चूंदा लकडा (दोघेही रा. कवडू, जि. बलरामपूर, छ.ग.), राजेश पुरुषोत्तम सोनकुसरे (रा. तळेगाव, ता. कुरखेडा) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना अटक करून मा. न्यायालयात हजर करण्यात आले असता २०/०६/२०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या कारवाईत गडचिरोली व छत्तीसगड येथील पोस्टे मुरुमगाव, कोरची, आरमोरी, पुराडा, कोटगुल, धानोरा आणि छत्तीसगडातील ठिकाणी दाखल असलेल्या एकूण १४ गुन्ह्यांची उकल झाली असून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या तपास मोहिमेसाठी पोमके सावरगावचे पो.उ.नि. विश्वंभर कराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मोठे योगदान दिले. याशिवाय स्थागुशा गडचिरोलीचे पो.नि. अरुण फेगडे, सपो.नि. भगतसिंग दुलत, मपो.उ.नि. सिद्धेश्वरी राऊत व इतर अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तपणे कारवाई पार पाडली.
वरील सर्व कारवाई पोलीस अधीक्षक ल नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा (अति. कार्यभार) रविंद्र भासले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @gadcholi police #LCB )