६ लाखांचे बक्षीस असलेला मन्नू सुलगे शेवटी गडचिरोली पोलिसांच्या तावडीत
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, २८ जून : जिल्ह्यात माओवादी विरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत घातपाताच्या तयारीत असलेला अति-जहाल माओवादी अटक झाला आहे. उपविभाग भामरागड अंतर्गत कवंडे जंगल परिसरात रेकी करत असताना त्याला शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या माओवादीचे नाव अंकल ऊर्फ मन्नू सुलगे पल्लो (वय २८, रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली) असे आहे. तो कोरची दलममध्ये उपकमांडर पदावर कार्यरत असून, त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने सहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस व सीआरपीएफच्या पथकाने २७ जून रोजी कवंडे परिसरात माओवादीविरोधी विशेष अभियान राबवताना एका संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला पोलीस मुख्यालयात आणल्यानंतर त्याची ओळख मन्नू सुलगे पल्लो या जहाल माओवादी म्हणून पटली. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत ३ चकमक व २ खुनाचे गुन्हे नोंद असून, तो दि. १ मे २०१९ रोजी कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात १५ पोलिस जवानांच्या हत्येचा कारणीभूत ठरलेल्या भूसुरुंग स्फोटातही सहभागी होता.
माओवाद्यांविरुद्धच्या अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेला मन्नू सुलगे २०१२ मध्ये छत्तीसगडमध्ये निब कंपनीत सदस्य म्हणून भरती झाला होता. त्यानंतर भामरागड व कोरची दलममध्ये उपकमांडर पदावर तो कार्यरत होता. २०२० पासून तो कवंडे जंगल परिसरात लपून राहून पोलिसांवरील हल्ल्यांसाठी रेकी करत होता.
त्याच्यावर खोब्रामेंढा जंगल परिसरात २९ मार्च २०२१ रोजी झालेल्या चकमकीप्रकरणी पोस्टे पुराडा येथे दाखल अप.क्र. 11/2021 नुसारही कारवाई करण्यात आली आहे. त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोस्टे कवंडेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. मंदार शिंदे, विशेष अभियान पथक आणि सीआरपीएफ ३७ बटालियनच्या सी कंपनीच्या जवानांनी ही कारवाई केली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी माओवाद्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे. मन्नू सुलगेच्या अटकेने गडचिरोली पोलीस दलाच्या माओवादी विरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले असून, जिल्ह्यात सुरक्षेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal)










