गडचिरोलीत अनोळखी मजुराचा मृत्यू; जावेद खान यांनी उचलली माणुसकीची जबाबदारी

669

गडचिरोलीत अनोळखी मजुराचा मृत्यू; जावेद खान यांनी उचलली माणुसकीची जबाबदारी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ६ जुलै :- जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ओळख पटवता न आल्यामुळे मृतदेह बेवारस स्थितीत राहिला असताना, अल्पसंख्याक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जावेद खान यांनी जात-धर्माचा विचार न करता केवळ माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करून एक आदर्श घालून दिला.
मृत व्यक्ती विनोद चौधरी (वय ५५) हे शहरातील शाकीर शेख यांच्या स्क्रॅप दुकानात मजूर म्हणून कार्यरत होते. दोन आठवड्यांपासून आजारी असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, कोणतेही ओळखपत्र, संपर्क क्रमांक किंवा नातेवाईक नसल्याने मृतदेह रुग्णालयातच बेवारस राहिला.
याची माहिती मिळताच शाकीर शेख यांनी ती जावेद खान यांच्यापर्यंत पोहोचवली. जावेद खान यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली आणि कोणत्याही भेदभावाशिवाय संपूर्ण जबाबदारी घेतली. पोलिस व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विनोद चौधरी यांच्या पार्थिवावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार केले.
यावेळी अल्पसंख्याक काँग्रेसचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. जावेद खान यांच्या या माणुसकीच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.