– गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २६ जुलै :- जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे नुकतीच एक अत्यंत दुर्मिळ आणि जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका महिला रुग्णाच्या पोटातून तब्बल ५० सें.मी. लांबीचा केसांचा गोळा (Trichobezoar) बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. वेळेवर ही शस्त्रक्रिया झाली नसती, तर रुग्णाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती.
शस्त्रक्रियेसाठी जबाबदारी स्वीकारत डॉ. कृणाल चेंडकापूरे (वरिष्ठ सर्जन, शल्य चिकित्सक तथा प्राध्यापक) यांनी ही धाडसी आणि कौशल्यपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांनी त्वरीत निदान करून रुग्णाच्या पोटातील गुंतागुंतीची स्थिती हेरली आणि तातडीने ऑपरेशन करत केसांचा गोळा बाहेर काढला.
या शस्त्रक्रियेमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, ऑपरेशन प्रभारी परिसेविका, भुलतज्ञ, स्टाफ नर्सेस आणि वर्ग ४ कर्मचारी यांनी दिलेले सहकार्यही अतिशय महत्त्वाचे ठरले.
ही शस्त्रक्रिया गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय कार्यक्षमतेचा उत्तम नमुना असून, ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांसाठी आश्वासक बाब आहे. मानसिक आजारांमुळे होणाऱ्या अशा गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांकडे गांभीर्याने पाहणे आणि वेळेवर निदान-उपचार करणे किती महत्त्वाचे आहे, याचे हे उदाहरण आहे, असे डॉ. चेंडकापूरे यांनी स्पष्ट केले.
या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉ. कृणाल चेंडकापूरे आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाचे जिल्ह्याभरातून अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra #crime #आरोग्य विभाग )













