राज्य सरकारच्या आश्वासनांना हरताळ? शेतकरी, कंत्राटदार, महिलांची फसवणूक : अनिल देशमुखांचा सरकारवर घणाघात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २९ :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकार स्थापन होऊन ९ महिने उलटले तरी एकही शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचा लाभार्थी झालेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
शेतकऱ्यांची अवस्था दयनीय — आत्महत्यांचा आकडा धक्कादायक
पुर, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारकडून थातूरमातूर मदतीपुरतीच भूमिका घेतली जात आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात तब्बल ६१२६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यातील सुमारे ५०% आत्महत्या विदर्भात झाल्या आहेत.
देशमुख म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर कर्जमाफी आणि हमीभाव योजनेची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे.”
धान खरेदी व बोनसमध्ये अनागोंदी
शासनाने मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेल्या निर्णयानुसार प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केल्यावरही बोनसची अंमलबजावणी फक्त निवडक शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली. “केंद्रावर विक्री केलेल्या अनेक शेतकऱ्यांनाही बोनस मिळालेला नाही, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे,” असे देशमुख यांनी स्पष्टपणे नमूद केले.
धानाच्या हमीभावाऐवजी व्यापाऱ्यांकडून १७००-१८०० रुपयांमध्ये धान खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पन्न येत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
खते विक्रीत लिंकींगचा गोरखधंदा
धान पिकासाठी आवश्यक असलेल्या डीएपी व युरियाच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसत असून, खत कंपन्या लिंकींगच्या नावाखाली अनावश्यक वस्तू जबरदस्तीने विकत आहेत. कृषी विभाग कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी केंद्रांवर खापर फोडतो, हे दुर्दैवी आहे, असे देशमुख म्हणाले.
लाडकी बहिण योजना फक्त निवडणूकपुरती?
निवडणुकीपूर्वी महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने अद्याप तो शब्द पाळलेला नाही. आज ९ महिने उलटूनही महिलांना फक्त १५०० रुपये मिळाले आहेत. “हे सरळसरळ महिलांची फसवणूक असून, राज्याच्या तिजोरीचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी केला गेला,” असा घणाघात त्यांनी केला.
कायदा-सुव्यवस्था धोक्यात; सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
राज्यात गुन्हेगारीचा सुळसुळाट झाला असून, बलात्कार, खून, भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांमध्ये वाढ झाली आहे. “सत्ताधारी मंत्र्यांचे गुन्हेगारीशी संबंध उघड होत असून, सामान्य नागरिकांना सत्ताधारी आमदारांकडून मारहाणीचा सामना करावा लागत आहे,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
९० हजार कोटींची बिले थकीत — कंत्राटदार आत्महत्या करायला मजबूर
राज्यातील विकास कामे पूर्ण करूनही कंत्राटदारांना गेल्या वर्षभरात देयके मिळालेली नाहीत. जवळपास ९० हजार कोटींची बिले प्रलंबित असून, याच आर्थिक तणावामुळे ३५ वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटील याने आत्महत्या केली. जलजीवन मिशनचे काम पूर्ण करूनही त्याचे १.४ कोटी रुपयांचे बिल थकले होते.
राज्य सरकार जबाबदारी झटकते — देशमुख यांचा आरोप
“एकीकडे आश्वासने देताना मोठमोठे बोल, आणि दुसरीकडे वास्तवात शेतकरी, कंत्राटदार, महिला आणि सामान्य जनतेची थट्टा — हेच भाजप सरकारचे खरे रूप आहे,” अशा शब्दांत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @Anil Deshmukh
#शेतकरीआत्महत्या #कर्जमाफीकधी #धानबोनसफसवणूक #लाडकीबहिणींचीफसवणूक #विकासकामांचेबिल #अनिलदेशमुख #राजकीयआरोप










