रिक्त पदे भरा, एअर अँब्युलन्स द्या : गडचिरोलीसाठी बेलसरे यांचा मंत्रालयात आक्रमक आवाज

278

– जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवरील हलगर्जीपणावर शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांची आरोग्यमंत्र्यांना विविध मागणी

लोकवृत्त न्यूज
मुंबई :- गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील अनेक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना, शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी थेट मंत्रालय गाठून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबिटकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा आढावा मांडत, विविध समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.
बेलसरे यांनी स्पष्टपणे निदर्शनास आणून दिले की, जिल्ह्यातील अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून, ही पदे तातडीने भरली जाणे आवश्यक आहे. तसेच, बाहेरील कर्मचाऱ्यांकडून वारंवार प्रतिनियुक्ती घेतली जात असल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा प्रतिनियुक्त्या त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
रुग्णवाहिकांची कमतरता लक्षात घेता जिल्ह्यात 108 ॲम्ब्युलन्सची संख्या वाढवावी व गंभीर रुग्णांसाठी एअर अँब्युलन्सची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून दुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बेलसरे यांनी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध खरेदी व बांधकामातील कथित घोटाळ्यांचा मुद्दाही उपस्थित केला. औषधी भांडार विभागाचे प्रमुख अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक हे मुख्य आरोपी असूनही अद्याप मोकाट आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणात श्री. महेश देशमुख व इतर दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी या सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या भेटीप्रसंगी कोरची तालुका प्रमुख कृष्णा नरडांगे, बंगाली आघाडी जिल्हाप्रमुख आसिद मिस्त्री, राकेश बैस आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.