लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचा डंका – राज्यस्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप, मोनिकाने उंच उडीत पटकावले रौप्य पदक

187

– राज्यस्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप, मोनिकाने उंच उडीत पटकावले रौप्य पदक

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ८ : लॉयड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए) च्या खेळाडूंनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील रामनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एलएसएच्या व्हॉलीबॉल संघाने अंतिम सामन्यात २-० अशा फरकाने विजेतेपद पटकावून चॅम्पियनशिप ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, पुणे येथे २ ते ५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गडचिरोलीची उदयोन्मुख खेळाडू व एलएसएची प्रशिक्षणार्थी सुश्री मोनिका मडावी हिने २० वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत १.४० मीटर उडी मारून रौप्य पदक मिळवले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील तब्बल २,१०० खेळाडू सहभागी झाले होते.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे मोनिका मडावी ही येत्या १८ ते २० सप्टेंबरदरम्यान मध्य प्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांतील अव्वल खेळाडू सहभाग घेणार आहेत.
लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “ग्रामीण व आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिभेला योग्य दिशा देऊन राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांचे हे यश आहे. आमचे उद्दिष्ट जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देऊन गडचिरोलीला क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख केंद्र बनवणे आहे.”
या विजयानंतर एलएसएच्या खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण असून स्थानिक तरुणाईसाठी हे यश प्रेरणादायी ठरत आहे.

 

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #LLOYDS METALS #Lloyds Metals and Energy Limited)