मार्कंडादेव येथे शिवलिंग स्थापना सोहळा भक्तिमय उत्साहात संपन्न
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : तालुक्यातील पवित्र तीर्थक्षेत्र मार्कंडादेव नगरीत जय संतोषी माँ शक्तिपीठ संस्थानच्या वतीने मार्कंडेय शिवमंदिरात सोमवार १५ सप्टेंबर रोजी नवीन शिवलिंगाची स्थापना विधीवत पार पडली.
या शुभमुहूर्तावर मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत सुरपाम यांच्या मार्गदर्शनाखाली छबिलदास नारायण सुरपाम व अल्का सुरपाम यांच्या हस्ते मंत्रोच्चार, हवन, अभिषेक व पूजाअर्चा करून शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सोहळ्यास गावकरी, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रथम गणपती पूजनानंतर शुद्ध जलाने शिवलिंगाचा अभिषेक झाला. ल “ॐ नमः शिवाय” आणि “हर हर महादेव” च्या घोषणांनी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला.
महिला भक्तांनी पारंपरिक वेशभूषेत शिवभजन व अभंग गाऊन सोहळ्याला अधिक भक्तिमय केले. पुरुष भक्तांनी शिवलिंगाभोवती प्रदक्षिणा घालून पूजाविधीत सहभाग घेतला. यानंतर सर्वांना प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. “शिवलिंग स्थापना ही गावाच्या श्रद्धा व एकतेचे प्रतीक असून यामुळे धार्मिक वातावरण अधिक बळकट झाले आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
जय संतोषी माँ शक्तिपीठ संस्थानच्या प्रयत्नातून पार पडलेल्या या मंगल सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात येथे नियमित पूजा-अर्चा व विविध धार्मिक उत्सव साजरे करण्याचा संस्थानचा मानस आहे.










