हालूर ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय

121

महिलांच्या पुढाकाराने गावात दारूबंदीचा ठराव

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- “दारूमुक्त समाज, आरोग्यदायी भविष्य” या ध्येयाने प्रेरित होत गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावाने एक ऐतिहासिक ठराव मंजूर केला आहे. विशेष म्हणजे या ठरावात गावातील महिलांनी आघाडी घेत निर्णायक भूमिका बजावली.
दारू सेवनामुळे होणारे कौटुंबिक वाद, आरोग्य बिघाड, आर्थिक अस्थिरता आणि अपघात याविरोधात महिलांनी ठामपणे आवाज उठवला. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशन (एलआयएफ) यांच्या प्रेरणेने हालूर ग्रामस्थांनी दारूबंदीचा ठराव एकमुखाने मंजूर केला.
गावातील महिलांच्या या सक्रियतेला ग्रामस्थांकडून भरभरून पाठिंबा मिळाला. त्यांच्या सामूहिक निर्धारामुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, आरोग्य सुधारेल आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
या ठरावासाठी गावातील सरपंच श्रीमती अरुणाताई मधुकर सडमेक, पाटील श्री. लच्चू हेडाऊ, भूमिया श्री. धनसू होडे, महिला मंडळ अध्यक्षा कलावती तिरकी, उपाध्यक्षा फुलसिना एक्का, सचिव बाली हेडो यांच्यासह महिला व ग्रामस्थांनी विशेष पुढाकार घेतला.
हालूरच्या महिलांनी दाखवलेला धाडसी व परिवर्तनकारी निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, दारूमुक्त गावाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ग्रामविकासाचा नवा आदर्श निर्माण करेल, असे सर्वत्र कौतुक होत आहे.