कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळेत शैक्षणिक सुधारणा विषयक दोन दिवसीय चर्चासत्र संपन्न

194

कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळेत शैक्षणिक सुधारणा विषयक दोन दिवसीय चर्चासत्र संपन्न

लोकवृत्त न्यूज
मोहगाव :- गडचिरोली जिल्ह्यातील मोहगाव येथील कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळेत (गोंडी शाळा) दि. ६ व ७ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांचे पालक, शाळेची प्रशासकीय समिती, ग्रामसभा सदस्य आणि शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

चर्चासत्रात शाळेतील शिक्षण प्रणाली, अभ्यासक्रमाची दिशा, प्रवेशाचा उद्देश, आणि गोंडी शिक्षणव्यवस्थेची गरज या विषयांवर सखोल चर्चा झाली. सामूहिक गट कृतीतून पालकांच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या व त्यांचे सादरीकरण करण्यात आले.

ऑनलाइन माध्यमातून अॅड. बोधी रामटेके आणि अॅड. पल्लवी देहरी यांनी सहभाग घेत शाळेच्या कायदेशीर व शैक्षणिक बाबींवर मार्गदर्शन केले.
कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल शाळा ही गोंडी व इंग्रजी भाषांमधून शिक्षण देणारी एक अभिनव संस्था असून, ती संविधानिक मूल्यांशी सुसंगत आहे. मात्र, शासन मान्यता अद्याप मिळालेली नाही, आणि या शाळेचा न्यायालयीन लढा गेल्या सहा वर्षांपासून सुरू आहे.

अडचणी असूनही शाळेच्यावतीने “ऑनलाइन लंडनवारी”, शेतीविषयक प्रत्यक्ष अभ्यास, तसेच सामाजिक विषयांवरील चर्चासत्रे अशा विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे.

या कार्यक्रमात शिक्षक शेषराव गावडे, अविनाश श्रीरामे, शिक्षिका सगुणा नैताम, तसेच ग्रामसभेचे देवसाय आतला, बावसू पावे आणि इतर सदस्य व पालकांनी सक्रिय सहकार्य केले.

कोया ज्ञानबोध शाळेचा हा उपक्रम स्थानिक भाषिक शिक्षणाला बळकटी देत, आदिवासी समाजाच्या शिक्षणप्रणालीला नवा आयाम देणारा ठरत आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.