गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी , एकास अटक – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

79

गडचिरोली : प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची तस्करी , एकास अटक – ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर घातलेल्या बंदीचा भंग करून अवैधरित्या सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपी ललीत गोपालदास राठी (वय ४१, रा. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने ९ ऑक्टोबर रोजी वडसा परिसरात केली.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील अवैध दारू, जुगार, सुगंधित तंबाखू व अन्य बेकायदेशीर धंद्यांवर आळा घालण्यासाठी विशेष मोहिम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला खात्रीशीर माहिती मिळाली की, ललीत राठी हा आपल्या ग्रे रंगाच्या मारुती इको चारचाकी वाहनातून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा करण्यासाठी देसाईगंजकडे जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडसा येथील कन्नमवार वॉर्ड परिसरात आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयाजवळ सापळा रचला. पोलिसांना पाहून एक संशयित इसम हातातील चुंगळी टाकून पसार झाला, मात्र वाहनचालक ललीत राठी यास पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाच्या मागील बाजूस पांढऱ्या व पिवळ्या चुंगळ्यांमध्ये हिरव्या रंगाचे ‘होल्ला हुक्का शिशा तंबाखू’ व लाल रंगाचे ‘ईगल हुक्का तंबाखू’ या नावांचे मोठ्या प्रमाणात पॅकेट्स आढळून आले. या कारवाईत एकूण १,००० ग्रॅम वजनाचे १३० पॅकेट्स (किंमत १,७२,२५० रुपये), ४०० ग्रॅम वजनाचे १५४ पॅकेट्स (किंमत १,३०,९०० रुपये), एक जुनी चारचाकी इको वाहन (किंमत ३ लाख रुपये) तसेच आरोपीकडील २,१९,६०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख २२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चौकशीत आरोपी ललीत राठीने सांगितले की, हा माल वडसा येथील राज प्रोव्हिजन दुकानाचे मालक इंद्रकुमार नागदेवे यांच्या सांगण्यावरून विक्रीसाठी आणण्यात आला होता आणि तंबाखूचा साठा रवी मोहनलाल खटवानी (रा. गोंदिया) याचा असल्याचे त्याने कबूल केले.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन देसाईगंज येथे आरोपी ललीत गोपालदास राठी, रवी मोहनलाल खटवानी आणि इंद्रकुमार नागदेवे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), २७५, २७४, २२३, १२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी ललीत राठी याला अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज. जी. यांच्या देखरेखीखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं. राजू पंचफुलीवार व चापोअं. दिपक लोणारे यांनी पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. प्रेमकुमार दांडेकर, पो.स्टे. देसाईगंज हे करीत आहेत.