बोगस मजुरांच्या नावावर अफरातफर : आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा ठपका

108

कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन छेडण्याचा संघटनांचा इशारा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- आलापल्ली वनपरिक्षेत्रात बोगस मजुरांच्या नावावर बनावट स्वाक्षऱ्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आलापल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती गडचिरोली जिल्हा शाखेच्या प्रतिनिधींनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) रमेश कुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले की, मजुरांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन, आरटीजीएसद्वारे रकमेचा व्यवहार दुसऱ्यांच्या खात्यावर करण्यात आला, तर वाउचर वेगळ्या नावाने दाखवण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणामागे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संघटनांनी यापूर्वीच घोटाळ्याचे ठोस पुरावे वनविभागास सादर केले असूनही कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जर दहा दिवसांच्या आत आरोपी अधिकाऱ्यांवर निलंबनासह गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तर येत्या १७ ऑक्टोबर २०२५ पासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या जनआंदोलन सुरू करण्यात येईल,” असा इशारा संघटनांनी दिला आहे.
तसेच, गौरव गणवीर यांनी पूर्वी पेरमिली वनपरिक्षेत्राच्या कार्यकाळातही बोगस कामे केल्याचे आणि अधिनस्त कर्मचाऱ्यांशी “हिटलरशाही” पद्धतीने वागल्याचे गंभीर आरोप निवेदनात करण्यात आले आहेत. या सर्व बाबींचे पुरावे पत्रकार परिषदेत लवकरच सार्वजनिक केले जाणार असल्याची माहितीही संघटनांनी दिली.
या वेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ ढोलगे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे, तसेच माहिती अधिकार संघटनेचे युवा नेते सूरज हजारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.