पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन 
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३० :- दिवसेंदिवस वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये सायबर सुरक्षा जागरूकता निर्माण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘सायबर जनजागृती कार्यशाळेचे’ आयोजन कारमेल हायस्कूल, गडचिरोली येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नीलोत्पल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केंद्रीय गृह मंत्रालय व I4C (Indian Cyber Crime Coordination Centre) यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोबर 2025 हा महिना ‘सायबर जनजागृती महिना’ म्हणून देशभर साजरा केला जात असून, या अनुषंगाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलातर्फे विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेदरम्यान 8 वी ते 10 वीच्या सुमारे 250 विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाईन फसवणुकीपासून बचावाचे उपाय, सोशल मिडियाचा सुरक्षित वापर आणि वैयक्तिक माहितीचे संरक्षण या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्हिडिओंच्या माध्यमातून ओटीपी शेअर न करणे, अनोळखी लिंकवर क्लिक टाळणे, तसेच सायबर गुन्हा झाल्यास 1930/1945 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची माहिती देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, “आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाईन व्यवहार हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक आणि माहिती चोरी टाळण्यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. ‘1930’ आणि ‘1945’ हे सायबर गुन्ह्यांविरुद्धचे गोल्डन नंबर आहेत. विद्यार्थ्यांनी दररोज मोबाईलवर वेळ वाया न घालवता अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे.”
या कार्यशाळेच्या अनुषंगाने यापूर्वी गडचिरोली पोलिसांनी सायबर जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन केले होते. तसेच संपूर्ण महिनाभर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपपोस्टे, शाळा-महाविद्यालये आणि पोलिस मुख्यालयात विविध जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा, ऑनलाईन वेबिनार आणि सोशल मिडियावरील प्रचार मोहिमा राबविण्यात आल्या.
या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप, पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी पोनि विनोद चव्हाण, स्थागुशा गडचिरोलीचे पोनि अरुण फेगडे, तसेच कारमेल हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर मेलजो चेरीयन आणि उपमुख्याध्यापक फादर जॉर्ज वर्गीस उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोनि अरुण फेगडे, मपोउपनि सरीता मरकाम, सायबर पोलीस स्टेशनच्या मपोउपनि नेहा हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










