गडचिरोली : इंदिरा गांधी चौकात भीषण अपघात, स्कॉर्पिओने दुचाकीस्वह ओढत नेले

720

– चालक पोलिसांच्या ताब्यात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ५ :- शहरातील सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या इंदिरा गांधी चौकात आज (०५) संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका स्कॉर्पिओ वाहनाने दुचाकीस्वारास काही अंतरावर फरफटत नेले. या घटनेने परिसरातील नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर मार्गावरून येत असलेल्या MH34 AA 0232 क्रमांकाच्या स्कॉर्पिओ वाहनाने ट्रॅफिक सिग्नल सुटताच वेग घेत दुचाकीस्वाराला (MH33 X4568) धडक दिली आणि काही अंतरावर फरफटत नेले. अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला.
दरम्यान, स्कॉर्पिओ चालकास पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले असून, तो मद्यधुंद अवस्थेत होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
इंदिरा गांधी चौकातील ट्रॅफिक सिग्नल प्रणालीत गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक बिघाड असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. टायमर न दाखवल्याने आणि केवळ हिरवा सिग्नल लागत असल्याने चौकात वाहनचालकांमध्ये घाईगडबड निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने सिग्नल यंत्रणा दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे.
अपघाताच्या तपासाची पुढील कार्यवाही गडचिरोली शहर पोलीस करीत आहेत.