अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले
लोकवृत्त न्यूज
सावली, दि.२३. : सावली वनपरिक्षेत्राने अवैध उत्खननाविरोधात राबविलेल्या धडक मोहिमेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. उपवनपरिक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत सिरशी बीटातील कढोली गावालगतच्या गट क्रमांक 144 मधील वनभूमीत विनापरवानगी व्यावसायिक उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तत्काळ छापा टाकून ३ ट्रॅक्टरसह १ जेसीबी जप्त केली.
21 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता क्षेत्र सहाय्यक राखुंडे आणि वनरक्षक महादेव मुंडे हे रात्रकालीन गस्त करीत असताना कढोली परिसरातील वनक्षेत्रात खोदकामाच्या हालचाली आढळून आल्या. यंत्रणांचा आवाज आणि वारंवार सुरू असलेल्या फेऱ्यांमुळे बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची खात्री होताच पथकाने झटपट कारवाई करत उत्खनन माफियांना वेढा घातला. या वेळी मलेशे नरसया मेरफुलवार (मु. हरांबा) यांच्या मालकीची जेसीबी तसेच महिंद्रा BV5332, स्वराज 843 XM व स्वराज 735 FE अशी तीन ट्रॅक्टर वाहने जप्त करण्यात आली.
घटनास्थळी पंचनामा करून वन गुन्हा नोंदविण्यात आला असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 33(1)(इ) व 35(1)(ग) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मोहिमेत सतीश नागोसे, रमेश बोनलवार, सतीश मजोके, बंडू दुधे, रवी सोनुले, मारोती पिपरे, नेहरू पाल तसेच पीआरटी चमू शिरशी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईबाबत पुढील तपास विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करीत आहेत. सावली तालुक्यातील बेकायदेशीर उत्खननावर ही कारवाई मोठा चपराक ठरत असून या मोहिमेनंतर उत्खननकर्त्यांचे धाबे दणाणले आहे.













