राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा गिताताई हिंगे यांचे भीषण अपघातात निधन

796

– पाचगाव नजीक मध्यरात्री दुर्घटना

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : नागपूरगडचिरोली महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा व आधारविश्व फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. गिताताई हिंगे यांचे दुर्दैवी निधन झाले.
पाचगावजवळ १२.३० वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे पती आणि वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.
सौ. गिताताई हिंगे या कुशल संघटिका म्हणून परिचित होत्या. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भाजपला रामराम करत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली होती. गडचिरोली जिल्ह्यात त्यांनी सक्रिय संघटनात्मक काम करून महिला आघाडी बळकट केली होती.
7 डिसेंबर रोजी त्या आपल्या पतीसह नागपूरवरून गडचिरोलीकडे येत होत्या. पाचगाव परिसरात त्यांच्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. जोरदार धडक बसल्याने गिताताईंचा मृत्यू जागीच झाला. पती व चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची वार्ता शहरात समजताच शोककळा पसरली. राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठा धक्का बसला असून एक कुशल संघटिका गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अपघाताबाबत काही स्थानिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले असून दुर्घटना संशयाच्या भोवऱ्यात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.