विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटनाला भव्यदिव्य पेंडाल कशासाठी?

356

– गडचिरोलीत शिक्षणाचा सोहळा की खर्चाचा दिखावा?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि मेसर्स लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक–खाजगी भागीदारीतून उभारण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था, गडचिरोली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी अडपल्ली येथे २७ डिसेंबर रोजी अभूतपूर्व थाटामाट करण्यात आला आहे. मात्र या उद्घाटन सोहळ्यासाठी उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य पेंडाल, सजावट, मंच व्यवस्था आणि प्रोटोकॉलवरील लाखो रुपयांच्या खर्चामुळे विद्यापीठाच्या प्राधान्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागास, आदिवासीबहुल आणि मूलभूत शैक्षणिक सुविधांसाठी आजही संघर्ष करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या गरजांपेक्षा उद्घाटनाचा दिखावा अधिक महत्त्वाचा ठरतो आहे काय, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्यासाठी मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि उद्योगपतींची मोठी फौज आमंत्रित करण्यात आली असून, कार्यक्रमाचे स्वरूप पाहता हा शैक्षणिक उपक्रम कमी आणि राजकीय शक्तीप्रदर्शन अधिक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. ग्रंथालये, प्रयोगशाळा, वसतिगृहे, संशोधन सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शैक्षणिक साधनसामग्री यासाठी निधी अपुरा असल्याच्या तक्रारी असताना, केवळ एका दिवसाच्या उद्घाटनासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याचे औचित्य काय, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे.
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेत प्रवेशित विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठात शिकण्याची संधी दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली असली तरी ही संधी प्रत्यक्षात किती विद्यार्थ्यांना मिळणार, त्यासाठी निवड प्रक्रिया काय असेल आणि त्यासाठी किती निधी राखीव ठेवण्यात आला आहे, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिलेली नाही. भव्य मंच, आकर्षक प्रकाशयोजना आणि मोठे फलक उभारून गुणवत्तापूर्ण अभियंते आणि तंत्रज्ञ घडतील का, असा सवाल पालक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे.
उद्घाटनासाठी होणारा खर्च विद्यापीठाच्या निधीतून केला जात आहे की खासगी भागीदार कंपनीकडून, अथवा अप्रत्यक्षपणे सार्वजनिक पैशातून, याबाबतही अद्याप पारदर्शकता दिसून येत नाही. खर्चाचा तपशील जाहीर न केल्याने संशयाला आणखी बळ मिळत असून, सार्वजनिक संस्थांनी अशा बाबतीत उत्तरदायित्व पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात शिक्षण ही गरज आहे, प्रदर्शन नव्हे, ही बाब प्रशासन विसरत असल्याचा आरोप होत आहे.
विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था ही गडचिरोलीतील होतकरू आणि गुणवंत युवकांसाठी मोठी संधी ठरू शकते, मात्र दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षित प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम यांवर भर देण्याऐवजी उद्घाटनाच्या डामडौलावर भर दिला जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. संस्था भव्य उद्घाटनाने नव्हे, तर पारदर्शक कारभाराने, गुणवत्तापूर्ण शिक्षणाने आणि विद्यार्थ्यांच्या यशाने मोठी होत असते. त्यामुळे भव्यदिव्य पेंडाल कशासाठी, लाखो रुपयांचा खर्च का आणि त्याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना किती, या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देण्याची जबाबदारी आता गोंडवाना विद्यापीठ प्रशासनावर आहे.