अवैध दारूविक्री बंदीसाठी महिलांनी गाठले पोलिस ठाणे पोटेगाव पोमकेत दोन विक्रेत्यांची तक्रार

0
141
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. 10 सप्टेंबर : वर्षभरापासून सुरु असलेली अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथील महिलांनी थेट पोटेगाव पोलिस मदत केंद्र गाठले. सोबतच महिलांनी विक्रेत्याकडून जप्त केलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन करून आमच्या गावातील अवैध दारूविक्रीबंदी कायम ठेवण्याची विनंती केली.
मारोडा गावात मागील सहा वर्षांपासून दारूबंदी होती. गावाच्या मदतीने गावात अवैध दारूविक्री पूर्णतः बंद होती. मात्र, वर्षभरापासून काही विक्रेत्यांनी इतर ठिकाणाहून आणलेली दारू चोरट्या मार्गाने विक्री करण्यास सुरवात केली. यामुळे गावातील शांतता, सुव्यवस्था बिघडल्याने महिलांनी एकत्रित येऊन गावात दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील विक्रेत्यांना  अवैध व्यवसाय बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. परंतु, काही मुजोर विक्रेत्यांनी गाव संघटनेच्या निर्णयाला न जुमानता चोरट्या मार्गाने दारूविक्री सुरूच ठेवली. त्यामुळे महिलांनी अहिंसक कृती करत दारू जप्त केली व विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी महिलांनी थेट पोटेगाव येथील पोलिस मदत केंद्र गाठले.
दरम्यान, महिलांनी जप्त केलेली दारू पोलिसांच्या स्वाधीन करीत गावातील दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी १० लिटर दारू जप्त करीत महिलांच्या तक्रारीवरून गावातील दोन विक्रेत्यांवर कारवाई केली. सोबतच गावातील दारूबंदी टिकवून ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गाव संघटनेचे भाग्यश्री सोदिरवार, सरपंच जगदीश मडावी, तंमुस अध्यक्ष पांडुरंग नेचलवार, गीता वडेगवार, सविता गडगलवार, मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम, स्वीटी आकरे यांच्यासह गावातील महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here