भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर
– नागपूरला रवाना
लोकवृत्त न्यूज
कुनघाडा रै ( गडचिरोली ) : संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागताच्या उत्साहात असतानाच, चामोर्शी-गडचिरोली महामार्गावरील कुनघाडा रै बस थांब्यावर आज दुपारी रक्ताचा सडा पडला. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास एका भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत अतुल तुळशीराम कोसमशिल्ले (४२) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनघाडा रै येथील रहिवासी अतुल कोसमशिल्ले आणि संतोष सुधाकर भांडेकर (३८) हे दोघे आपल्या दुचाकीने गावाकडून चामोर्शीच्या दिशेने जात होते. ते बस थांब्याजवळ पोहचले असता, चामोर्शीकडून गडचिरोलीच्या दिशेने सुसाट वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अतुल कोसमशिल्ले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कानातून रक्तस्राव सुरू झाला, तर संतोष भांडेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अवैध पार्किंगमुळे मृत्यूचा सापळा!
या अपघातासाठी महामार्गावरील बस थांब्याजवळ असलेले बिस्वास यांचे हॉटेल (ढाबा) आणि त्यासमोर उभी राहणारी जड वाहने कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. ढाब्यासमोर ट्रक व इतर जड वाहने अस्ताव्यस्त उभी राहत असल्याने, गावातून हायवेवर येणाऱ्या वाहनधारकांना मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज येत नाही. याच पार्किंगमुळे हा ‘ब्लाईंड स्पॉट’ तयार झाला असून, आजच्या अपघातालाही हेच मुख्य कारण ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अतुल यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले आहे. अपघाताला कारणीभूत ठरलेली स्कॉर्पिओ नेमकी कोणाची? याचा अद्याप शोध लागलेला नसून चामोर्शी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.














