दारूच्या नशेत ॲम्बुलन्सचा थरार ; मलेरिया रुग्ण नेत असताना अपघात

365

रीडवाई–मुरुमगाव मार्गावरील पुलाजवळ घटना, मोठी दुर्घटना टळली

लोकवृत्त न्यूज
धानोरा : रीडवाई गावातून मलेरिया बाधित बालरुग्णास उपचारासाठी मुरुमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना ॲम्बुलन्सचा भीषण अपघात झाल्याची घटना रीडवाई–मुरुमगाव रस्त्यावरील पुलाजवळ ३१ डिसेंबर रोजी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठी दुर्घटना टळली आहे.

माहितीनुसार, रीडवाई गावातील दोन ते अडीच वर्षांची मलेरिया बाधित चिमुकली उर्फिता कोराम हिला तिची आई सोनी आशिष कोराम यांच्यासह ॲम्बुलन्स क्रमांक MH 33 T 1716 (महिंद्रा कंपनी) मधून मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात येत होते. मात्र, ॲम्बुलन्स चालक विलास उसेंडी हा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि पुलाजवळ ॲम्बुलन्स रस्त्याच्या कडेला पलटी झाली.

या अपघातात बालरुग्ण व तिच्या आईला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मुरुमगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, काही पत्रकारांकडून उद्धट वर्तन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जनसेवा वैद्यकीय अधिकारी व दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

दारूच्या नशेत ॲम्बुलन्स चालविणे हा अत्यंत गंभीर व निष्काळजीपणाचा प्रकार असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या चालकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. योग्य वेळी परिस्थिती नियंत्रणात आल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.