ट्रॅक्टर चालकावर काळाचा घाला : उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, तरुण ठार

293

– कुरुड फाट्याजवळ ३१ डिसेंबरच्या रात्री भीषण अपघात

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली / कुरुड : वर्षअखेरच्या दिवशी दिवसभर राबराब राबून घराकडे परतणाऱ्या एका तरुण ट्रॅक्टर चालकावर काळाने झडप घातली. कुरुड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ३१ डिसेंबर रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. रवींद्र भिवाजी बावणे (३८, रा. तळोधी) असे मृत चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र बावणे हे नाचनगाव देवळी येथील गुरुदास बारसागडे यांच्याकडे ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत होते. ३१ डिसेंबर रोजी दिवसभर ट्रॅक्टरचे काम आटोपल्यानंतर रवींद्र यांनी मालक बारसागडे यांच्या घरीच जेवण केले. त्यानंतर आपल्या गावी (तळोधी) जाण्यासाठी ते बारसागडे यांची दुचाकी (क्रमांक एमएच ३३, एन ४८०६) घेऊन निघाले होते.
कुरुड फाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर (क्रमांक सीजी ०४, एनडब्ल्यू ८२५५) रवींद्र यांची दुचाकी पाठीमागून प्रचंड वेगाने आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, रवींद्र यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रवींद्र यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गुरुदास बारसागडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे करत आहेत. थर्टी फस्टच्या दिवशीच घडलेल्या या अपघातामुळे तळोधी परिसरात शोककळा पसरली आहे.