सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त धानोऱ्यात वाचन संस्कारांचा जागर
लोकवृत्त न्यूज
धानोरा, :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त धानोरा शाखेमार्फत आज सावित्रीबाई फुले वाचनालय, धानोरा येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्त्री शिक्षण, वाचनसंस्कृती आणि स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी Sahayog Women’s Foundation (UDAAN – Dream Big Fly High) यांच्या वतीने वाचनालयास पोलीस भरती, रेल्वे भरती, विविध स्पर्धा परीक्षा तसेच बँकिंग परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके भेट देण्यात आली. तसेच वाचनालयात नियमित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पुस्तक देऊन त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन असून सातत्यपूर्ण अभ्यास व वाचनाची सवय यशाच्या दिशेने नेणारी असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
कार्यक्रमास बी.एम. शालिनी लांजेवार, बीडीओ लखन मडावी, बीओ अक्षय पद्मगीरवार, बीओ प्रतिमा मोहुर्ले, स्वयंसेविका हेमलता सहारे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.











