गडचिरोली शहर अतिक्रमणाच्या विळख्यात ; नवा नगराध्यक्ष कठोर निर्णय घेणार की तडजोड?

345

गडचिरोली शहर अतिक्रमणाच्या विळख्यात ; नवा नगराध्यक्ष कठोर निर्णय घेणार की तडजोड?

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील वाढते अतिक्रमण आता गंभीर चिंतेचा विषय बनले असून गडचिरोली शहर अक्षरशः बेकायदेशीर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. मुख्य मार्गांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत अतिक्रमणाने डोके वर काढले असून त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांचा दैनंदिन त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच पदभार स्वीकारलेल्या नव्या नगराध्यक्षांसमोर कठोर कारवाईचा मार्ग स्वीकारायचा की तडजोडीची भूमिका घ्यायची, असा ज्वलंत प्रश्न उभा ठाकला आहे.

शहरातील गोकुळनगर परिसर, तलाव परिसर, तसेच विविध वसाहतींमध्ये रस्त्यालगत उभारलेली घरे, दुकाने व तात्पुरत्या संरचना यामुळे रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहेत. अनेक ठिकाणी रस्त्याचा मूळ रुंदी आराखडाच पायदळी तुडवला गेला असून काही अतिक्रमणे अनेक वर्षांपासून बिनदिक्कत सुरू आहेत. परिणामी, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाहनांची कोंडी नित्याची झाली असून पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले आहे.

विशेषतः इंदिरा गांधी चौक, मुख्य बाजारपेठ आणि वर्दळीच्या मार्गांवर अतिक्रमणाने अक्षरशः साम्राज्य उभे केले आहे. रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून किरकोळ अपघातांची संख्या वाढत आहे. आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहनांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत असली तरी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. केवळ नोटिसा देऊन कारवाई थंडावल्याने अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढले असून नियमांची अंमलबजावणी केवळ कागदावरच उरल्याचे चित्र आहे.

अशा स्थितीत शहराला नवा नगराध्यक्ष मिळाल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अतिक्रमणावर कठोर कारवाई करून शहर शिस्तबद्ध करण्याचा धाडसी निर्णय घेतला जाणार का, की राजकीय व सामाजिक दबावाखाली तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार, याकडे संपूर्ण गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे. नव्या नगराध्यक्षांची ही पहिलीच मोठी कसोटी ठरणार असून त्यांच्या निर्णयावरच शहराचे भवितव्य ठरणार असल्याचे बोलले जात आहे.