जि. प. हायस्कूल माजी विद्यार्थी संघ अध्यक्षपदी उदय धकाते, माजी विद्यार्थ्यांत उत्साह
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ११ : जिल्हा परिषद (मा. शा.) हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, गडचिरोली येथील माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी उदय धकाते यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात येत असून, या संघांच्या माध्यमातून शाळांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविणे, माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करणे आदी उद्दिष्टे साध्य केली जाणार आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष उदय धकाते हे या शाळेचे माजी शाळानायक असून, सी. पी. अँड बेरार राज्यातील पहिले मेरिटधारक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक स्व. बी. डी. धकाते सर यांचे ते सुपुत्र आहेत. सन २०२४ मध्ये शाळेच्या अमृत महोत्सवाचे त्यांनी अत्यंत यशस्वी आयोजन करत सुमारे १५०० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना एकत्र आणले होते. हा मेळावा शाळेच्या इतिहासातील तसेच देशातील दुर्मिळ व ऐतिहासिक उपक्रम ठरल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.
नव्या कार्यकारिणीत मुख्य सल्लागार म्हणून माजी शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, उपाध्यक्षपदी जितेंद्र कोपुलवार, पदसिद्ध सचिव म्हणून प्राचार्य ई. एच. टेकाम, तर कोषाध्यक्षपदी पुष्पलता कुमरे यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून दादाजी वालको, विश्राम होकम, निलेश दंडवते, समीर कडीवाल, सुरेखा न्यालेवार, अरुण पोगळे, राजेश निखारे, राजेंद्र गव्हारे व शालिनीताई निंबारते यांचा समावेश आहे.
या निवड सभेचे संचालन व आभार प्रदर्शन सपना देशमुख यांनी केले. माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासाला नवी दिशा देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.











