आरमोरीला उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवांचा शुभारंभ ; किडनी रुग्णांना दिलासा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील किडनी आजारग्रस्त रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची आरोग्य सुविधा अखेर उपलब्ध झाली आहे. उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे Indian Public Health Standards (IPHS) अंतर्गत डायलिसिस सेवांचा शुभारंभ करण्यात आला. या जीवनरक्षक सेवांचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
आतापर्यंत किडनी विकाराने त्रस्त रुग्णांना डायलिसिससाठी जिल्हा मुख्यालय किंवा खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे आर्थिक भार, वेळेची नासाडी आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आरमोरी येथे डायलिसिस सेवा सुरू झाल्याने रुग्णांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार उपचार मिळणार असून आरोग्यसेवेत मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्घाटनप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार कोरेटी, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया उईके यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वर्षा लहाडे यांनी सांगितले की, शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अद्ययावत, परवडणाऱ्या व जीवनरक्षक सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आरमोरी येथे सुरू झालेल्या डायलिसिस सेवेमुळे किडनी आजारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपजिल्हा रुग्णालय, आरमोरी येथे सुरू झालेली ही डायलिसिस सेवा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सुविधा वरदान ठरेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.











