नगरपालिकेत ‘घराणेशाही’चा उद्रेक : नगरपालिकेचा कारभार नेमका कोण चालवणार?

217

– नगराध्यक्ष पत्नींच्या पाठोपाठ पतीची निवड झाल्याने शहरात जोरदार चर्चा

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१५ :- नुकतीच नगरपालिकेची निवडणूक पार पडून नगराध्यक्षांनी पदभार स्वीकारलेला असतानाच आज स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीने पालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. स्वीकृत नगरसेवक कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज या चर्चेवरील पडदा उघडला असून नगराध्यक्षांचे पती यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याने ‘घराणेशाही’चा आरोप जोर धरू लागला आहे.

नगराध्यक्षपद पत्नींकडे असताना स्वीकृत नगरसेवक म्हणून पतीची निवड झाल्याने नगरपालिकेचा प्रत्यक्ष कारभार कोण चालवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकृत सत्ता एका व्यक्तीकडे असली तरी निर्णयप्रक्रिया व प्रशासकीय सूत्रे पतीच हाताळणार असल्याची चर्चा शहरभर रंगू लागली आहे.

विशेष म्हणजे संबंधित पक्षाने आतापर्यंत सातत्याने इतर पक्षांवर ‘घराणेशाही’चा आरोप केला आहे. मात्र आता त्याच पक्षाकडून नगरपालिकेत पती–पत्नीच्या माध्यमातून सत्ता केंद्रीत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने पक्षाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. विरोधकांसह नागरिकांकडूनही यावर टीकेची झोड उठू लागली आहे.

या घडामोडींमुळे पालिकेतील इतर नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण असून पक्षाच्या गोटातही अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. लोकशाही मूल्ये, पारदर्शक कारभार आणि सामूहिक निर्णयप्रक्रिया यांचा बळी तर जात नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नगरपालिकेचा कारभार कायद्याच्या चौकटीत आणि लोकप्रतिनिधींच्या सामूहिक सहभागातून चालेल की सत्ता एका कुटुंबापुरतीच मर्यादित राहील, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.