धुळीच्या विळख्यात नवेगाव ; महिलांचा रस्त्यावर उतरून संताप, परिसरात तणाव
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १८ :- गडचिरोली जिल्हा मुख्यालयालगत नवेगाव (मूरखळा) येथे नव्या ले-आऊटमध्ये सुरू असलेल्या उपसा माती भरण्याच्या कामामुळे परिसर धुळीच्या विळख्यात सापडला आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
धुळीच्या त्रासाला कंटाळून संतप्त महिलांनी थेट रस्त्यावर उतरून डंपर व ट्रकची ये-जा रोखली. यावेळी काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग अधिक असून वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. याचा फटका लहान मुले, वृद्ध व महिलांना बसत असून खोकला, श्वसनविकार व डोळ्यांच्या त्रासात वाढ होत आहे.
नवेगाव बसस्टँड ते सेमाना रोड अनेक वर्षांपासून कच्चाच असून पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ अशी स्थिती आहे. धूळ नियंत्रणासाठी पाण्याचा मारा, रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण, गतिरोधक बसवणे तसेच कचरा संकलन तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.











