लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि. २७ :- गडचिरोली–आरमोरी मार्गावरील किटाळी गावाजवळ सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. तुळशीदास रामा सहारे (वय ४५, रा. देऊळगाव) असे मृताचे नाव असून, त्यांचा मुलगा विरेंद्र उर्फ पियू सहारे (वय २१) व दुचाकीचालक दिलीप सोमाजी टेकाम (वय ४८) हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप टेकाम हे तुळशीदास व विरेंद्र या बापलेकांसह एमएच-३४ पी-८७८५ क्रमांकाच्या दुचाकीवरून आकापूर येथील नातेवाईकांकडून देऊळगावकडे परत येत होते. किटाळी गावाजवळील बसथांब्याजवळ वळणावर समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रक (टीएस-०७ युके-३९९२) शी दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की तुळशीदास सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातावेळी तिघेही एकाच दुचाकीवर (ट्रिपल सीट) प्रवास करत होते व हेल्मेट परिधान केलेले नव्हते, अशी माहिती आहे. जखमी विरेंद्र सहारे व दिलीप टेकाम यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भा.न्या.सं. कलम २८१, १०६ (१), १२५ (ए), १५ (बी), ३२४ (४), १८४ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४ (ए) व (बी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वेगावर नियंत्रण व सुरक्षित वाहनचालना बाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.














