शाळकरी विद्यार्थ्यांनी शिस्त आचरणात आणणे काळाची गरज : डीवायएसपी सुरज जगताप

306

चामोर्शी येथे जिल्हा परिषद हाय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावर भर न देता शिस्तीचे आचरण अंगीकारणे ही काळाची गरज आहे. कारकिर्दीत यश मिळवायचे असेल तर शिस्त हा यशाचा कणा असून तिचा लाभ संपूर्ण आयुष्यात होत असतो, असे प्रतिपादन गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुरज व्ही. जगताप यांनी केले.
ते येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण व व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. जिल्हा परिषद शाळांतून अनेक अधिकारी घडले असून, या महाविद्यालयातूनही भविष्यात अनेक यशस्वी विद्यार्थी घडतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवा वक्ते तुषार दुधबावरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महाविद्यालयीन वय हा जीवनाला कलाटणी देणारा सर्वोत्तम टप्पा असतो. या काळात विद्यार्थी घडतही असतो, तसेच कुसंगतीकडे वळल्यास संपूर्ण आयुष्य उतरणीला लागू शकते. त्यामुळे देशाला आज सुशिक्षितासोबतच सुसंस्कारित पिढी अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले सुरज मेकर्तीवार यांनी ‘पॉक्सो’ कायदा तसेच विविध कायद्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत, कायदे हे समाजपरिवर्तन व सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठीच बनविण्यात आले असून प्रत्येक विद्यार्थ्याने कायदे व कर्तव्यांचे पालन करावे, असे आवाहन केले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ शिक्षक अविनाश तालापल्लीवार यांच्या संकल्पनेतून चामोर्शी शहरात प्रथमच देशातील विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी राष्ट्रीय एकात्मता रॅली आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमास मंचावर मान. मंदाताई वानखेडे (अध्यक्षा, व्यवस्थापन समिती), प्रकाश गेडाम (माजी सिनेट सदस्य, नागपूर विद्यापीठ), वाहतूक निरीक्षक किरण शिंदे, प्रेमाताई आईंचवार (अध्यक्षा, भौतिक व विज्ञान अभ्यास समिती), नगरसेविका चामोर्शी, सुधीर गडपायले (व्यवस्थापन समिती सदस्य), ललिता गडपायले (सदस्या) तसेच प्राचार्या मीना गदेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्याख्यानमालेला शेकडो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्नेहल टिचकुले यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक अविनाश तालापल्लीवार यांनी मानले.