नियतीचा क्रूर खेळ : प्रियकर वाचला, त्याच्यासाठी प्रेयसीने गमावले प्राण

667

नियतीचा क्रूर खेळ : प्रियकर वाचला, त्याच्यासाठी प्रेयसीने गमावले प्राण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : ‘तू नाही तर मीही नाही’ या भावनेतून एका प्रेमी युगुलाने टोकाचा निर्णय घेतला; मात्र नियतीने वेगळाच निर्णय लिहिला. मृत्यूशी झुंज देणारा प्रियकर उपचारांमुळे सुखरूप बचावला, तर तो वाचणार नाही या भीतीने गळफास घेतलेल्या प्रेयसीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गडचिरोली तालुक्यातील एका गावात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय तरुण आणि १९ वर्षीय तरुणी यांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. तीन वर्षांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. दीर्घकाळ उपचार सुरू असतानाही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने तो मानसिक नैराश्यात होता. उपचारासाठी कुटुंबाची सर्व जमापूंजी खर्च झाल्याने त्याच्यावर प्रचंड ताण होता.
या वैफल्यातून २८ जानेवारी रोजी तरुणाने विष प्राशन केल्याची माहिती आहे. मित्रांनी वेळीच हालचाल करत त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले.
दरम्यान, प्रियकर वाचणार नाही, अशी भीती मनात घर करून बसल्याने १९ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र सात दिवसांच्या उपचारानंतर २ फेब्रुवारी रोजी तिची प्राणज्योत मालवली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या प्रियकरासाठी तिने हे पाऊल उचलले तो सध्या धोक्याबाहेर आहे.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.