कर्जबाजारीपणाला कंटाळून पोर्ला येथील शेतकऱ्याची आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ६ :- गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथील शेतकरी गिरिधर कोलते (वय ६२) यांनी कर्जाच्या ओझ्याला कंटाळून आपल्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज ६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, गिरिधर कोलते हे आज सकाळी सुमारे ११ वाजताच्या दरम्यान शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून जीवनयात्रा संपविली. ही घटना लक्षात येताच गावकऱ्यांनी पोलीस पाटील हितेंद्र बारसागडे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटलांनी गडचिरोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.
ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे पाठविण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी मर्ग नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत शेतकरी गिरिधर कोलते यांच्या पश्चात पत्नी व मुले असा परिवार असून, कर्जबाजारीपणामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे गावात बोलले जात आहे.














