– बाम्हणी नदी घाटावर प्रकार, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.९ : तालुक्यातील बाम्हणी गावाजवळील कठानी नदीवरील रेतीघाटावरील रेती वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या धडकेत एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवार ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, रेती उत्खनन मजुरांच्या जीवावर उठत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
या घटनेत ईश्वर कुरुडकर (वय ३६), रा. बाम्हणी असे मृत मजुराचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाम्हणी परिसरातील कठानी नदी घाटातून रेती उत्खनन व वाहतूक सुरू आहे. शेतातून रेती काढण्याचा बहाणा करून थेट नदीपात्रात उत्खनन केले जात असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. दिवसाढवळ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींनी रेतीची वाहतूक होत असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे रेतीची वाहतूक सुरू असताना MH-33 AC 3047 क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची जबर धडक मजूर ईश्वर कुरुडकर याला बसली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर पोलिसांना तात्काळ माहिती न देता प्रकरण लपविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा आहे. रेतीघाट चालविणाऱ्यांकडून मृतदेह गुपचुप थेट रुग्णालयात नेऊन सोडण्यात आल्याची माहिती असून, त्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असताना प्रशासनाची भूमिका काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. अवैध रेती तस्करीला नेमके कुणाचे पाठबळ आहे? आणि या मृत्यूला जबाबदार कोण? असे सवाल नागरिकांतून केले जात आहेत.
या घटनेनंतर तरी प्रशासन अवैध रेतीघाटांवर कारवाई करणार का, दोषींवर गुन्हे दाखल होणार का, की हे प्रकरणही काळाच्या पडद्याआड जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.














