Home Breaking News गडचिरोलीत कोट्यवधींचा ‘कृषी कुंभ’… आणि मागे उरला कचराकुंभ

गडचिरोलीत कोट्यवधींचा ‘कृषी कुंभ’… आणि मागे उरला कचराकुंभ

664

– महाविद्यालय परिसरात प्लास्टिकचा थैमान, नगरपरिषदेची कारवाई होणार का?

लोकवृत्त आहे
गडचिरोली दि.१४ :- गडचिरोली जिल्ह्यात कृषी विभागाच्या आत्मा (ATMA) अंतर्गत कृषी महाविद्यालयाच्या परिसरात ०५ ते ०९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मोठ्या दिमाखात ‘कृषी कुंभ २०२६’ पार पडला. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमानंतर मात्र सात दिवस उलटूनही महाविद्यालय परिसरात प्लास्टिक व इतर कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत.
कार्यक्रम संपल्यानंतर स्वच्छतेची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे शासनाने सिंगल युज प्लास्टिकवर स्पष्ट बंदी घातलेली असताना, या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा वापर झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. वापरलेल्या प्लास्टिकच्या ग्लास, पाण्याच्या बाटल्या, थर्माकोल साहित्य आणि खाद्यपदार्थांचे रॅपर्स संपूर्ण परिसरात विखुरलेले दिसत आहेत.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून भव्य व्यासपीठे, मंडप आणि जाहिरातबाजी करण्यात आली मात्र कार्यक्रमानंतर परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाकडे निधी उरला नाही काय? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आयोजित मेळाव्यानेच पर्यावरणाचा बोजवारा उडवला, अशी टीकाही व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद प्रशासन सामान्य नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करत असते. मग या प्रकरणात संबंधित विभागावर काय कारवाई होणार? स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर समान निकष लागू होतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
‘स्वच्छता अभियान’ची गोड घोषणाबाजी आणि प्रत्यक्षात परिसरात साचलेला कचरा या विसंगतीमुळे प्रशासनाची भूमिका आता तपासली जाणार आहे. कृषी कुंभानंतर उरलेला हा ‘कचराकुंभ’ त्वरित हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

#KrishiKumbh2026 @lokvrutt.coc #lokvruttnews
#Gadchiroli #PlasticWaste #SingleUsePlasticBan #EnvironmentalNegligence
#PublicAccountability #CleanlinessDrive #GovernmentSpending #nagarparishad #nagarparishadgadchiroli #muncipalgadchiroli #krushi #gadchirolinews #WasteManagement #CivicResponsibility #SwachhBharat #AdministrativeFailure

Don`t copy text!