– आरोग्यमंत्र्यांची शोधग्रामला भेट
लोकवृत्त न्यूज
धानोरा : राज्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी गडचिरोलीचे ‘आरोग्य मॉडेल’ दिशादर्शक ठरणार असल्याचे संकेत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाशजी आबिटकर यांनी दिले. आज त्यांनी चातगाव येथील ‘शोधग्राम’ रुग्णालयाला सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विविध आरोग्य विषयांवर सविस्तर चर्चा केली.
आंबिटकर यांनी शोधग्राम येथील रुग्णालय, तिथली कार्यपद्धती आणि ‘सर्च’ (SEARCH) संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची पाहणी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी उभे केलेले हे कार्य आरोग्य क्षेत्रासाठी प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बैठकीदरम्यान डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी विकसित केलेले आरोग्य मॉडेल आणि त्याचे यश सादरीकरणाद्वारे मांडले.
दरम्यान माता-बाल मृत्यू दर: दुर्गम भागातील बालमृत्यू कमी करण्यासाठी राबवण्यात आलेले यशस्वी प्रयोग. सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकसहभाग कसा वाढवता येईल? आदिवासी बहुल भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण. याबाबत सादरीकरण केले.
”डॉ. अभय बंग यांनी आरोग्याच्या क्षेत्रात केलेले संशोधन केवळ देशासाठीच नव्हे, तर जगासाठी आदर्श आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि शोधग्राममधील प्रयोगांचा वापर राज्यातील आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख करण्यासाठी कसा करता येईल, यावर शासन सकारात्मक विचार करत आहे.”
— ना. प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री
यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, शोधग्राममधील वैद्यकीय चमू आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीमुळे आगामी काळात गडचिरोलीच्या आरोग्य सुविधांना नवीन बळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.











