मुख्यमंत्री माझी शाळा–सुंदर शाळा’ अभियानात निमगाव शाळेचा जिल्ह्यात पहिला क्रमांक : आमदार अडबले यांची विशेष भेट

194

मुख्यमंत्री माझी शाळा–सुंदर शाळा’ अभियानात निमगाव शाळेचा जिल्ह्यात पहिला क्रमांक : आमदार अडबले यांची विशेष भेट

लोकवृत्त न्यूज
​धानोरा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा’ अभियानात संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निमगाव हिने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या देदीप्यमान यशाची दखल घेत आमदार सुधाकर अडबले यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन समितीचे भरभरून कौतुक केले.

​शाळेत प्रवेश करताच आमदार अडबले यांनी शाळेच्या पालटलेल्या रूपाची प्रशंसा केली. बोलका परिसर, सुसज्ज डिजिटल क्लासरूम, विद्यार्थ्यांची शिस्त आणि शिक्षणाची गोडी वाढवणारे ‘वाचन कोपरे’ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. “ग्रामीण भागातील सरकारी शाळा खाजगी शाळांनाही मागे टाकू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे निमगाव शाळा आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.
​कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार अडबले म्हणाले की: ​”केवळ इमारतीला रंग लावून शाळा सुंदर होत नाही, तर तिथे मिळणारे संस्कार आणि शैक्षणिक दर्जा महत्त्वाचा असतो. निमगाव शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून केवळ गाण्याचाच नव्हे, तर जिल्ह्याचा मान वाढवला आहे. मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले कष्ट आज फळाला आले आहेत.”
​या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक देवेंद्र लांजेवार यांच्यासह शिक्षक वृंद: वर्षा नाकाडे, उषा बोरकर, रमेश काळबांडे, संतोष कोल्हे, प्रशांत कन्नाके व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भजन बरखडे, उपसरपंच चेतन सुरपाम,रोजगार सेवक यदुनाथ चापले आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. शाळेचा नयनरम्य परिसर आणि स्वच्छता. विद्यार्थ्यांसाठी राबवलेले कृतीप्रधान शिक्षण. शाळा आणि गावकरी यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण ही वैशिष्ट्ये निर्णायक ठरली आहे.
​या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, आमदार अडबले यांनी शाळेच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.