विदर्भातून राज्यसभेवर कोणाची वर्णी?

379

राणा-अहीर-नेते यांच्यात चुरस

लोकवृत्त न्यूज
मुंबई/नागपूर : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात राज्यसभेच्या आगामी निवडणुकीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. राज्यातून राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेच्या हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्ष (भाजप) गोटात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता भाजपकडे स्वतःच्या बळावर किमान तीन उमेदवारांना सहज राज्यसभेवर पाठवण्याइतकी ताकद आहे. त्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली असून, पक्षांतर्गत लॉबिंगला उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रदेश भाजपकडून तब्बल २५ संभाव्य उमेदवारांची यादी तयार करून ती अंतिम निर्णयासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठविण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर विदर्भातून कोणाला संधी मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जात असल्याने या भागाला प्रतिनिधित्व देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या विदर्भातून तीन प्रमुख नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात माजी खासदार नवनीत राणा, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर आणि ज्येष्ठ नेते अशोक नेते यांचा समावेश आहे. या तिघांनीही पक्षासाठी दीर्घकाळ काम केले असून, प्रत्येकाची स्वतःची राजकीय ताकद आणि समर्थकवर्ग आहे.
राज्यसभेची निवडणूक ही पक्षाच्या धोरणात्मक दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. सामाजिक, प्रादेशिक आणि राजकीय समतोल साधत उमेदवारी दिली जाण्याची परंपरा आहे. त्यामुळे विदर्भातून कोणाला प्राधान्य दिले जाणार, हे पूर्णपणे केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
राणा यांच्या लोकसभा कारकीर्दीचा अनुभव, अहीर यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा कार्यकाळ आणि नेते यांचे संघटनात्मक काम, या सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील भाजप कार्यकर्त्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, येत्या काही दिवसांत उमेदवारांची घोषणा होताच या राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे. विदर्भातून राज्यसभेवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.