Home Breaking News धानोरा उद्यानाचे ‘नंदनवन’ कोमेजले ; प्रशासकीय दुर्लक्षितपणामुळे वनसंपदा धोक्यात

धानोरा उद्यानाचे ‘नंदनवन’ कोमेजले ; प्रशासकीय दुर्लक्षितपणामुळे वनसंपदा धोक्यात

382

• ​नियोजनशून्य कारभाराचा फटका

लोकवृत्त न्यूज
ता/ प्र,धानोरा :- ​येथील सार्वजनिक उद्यानाची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली असून एकेकाळी धानोरावासीयांच्या विरंगुळ्याचे केंद्र असलेले हे उद्यान आज प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि देखभालीअभावी शेवटच्या घटका मोजत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, वन विभाग तसेच नगरपंचायत प्रशासन या दोन्ही यंत्रणांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
उद्यानाच्या प्रवेशद्वारावर लावलेले देखणे फुलपाखरू आणि चित्रे आज केवळ नावापुरतीच उरली आहेत. उद्यानाच्या आत गेल्यावर हिरवळीऐवजी वाळलेला पालापाचोळा आणि सुकलेली झाडेच नजरेस पडतात त्यामुळे संपूर्ण परिसरात सुक्या पानांचा खच पडल्याने येथे कधीही आगीची मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी सुकलेल्या झुडुपांना आग लागल्याच्या खुणाही स्पष्टपणे दिसून येत असून, यामुळे उद्यानातील दुर्मिळ वनसंपदेचे नुकसान होत आहे.
तर उद्यानातील स्वच्छतेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कचराकुंड्यांची दुरवस्था झाल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. उद्यानातील मुलांची खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहेत, बसण्याची आणि प्रकाशाची व्यवस्थाही अपुरी आहे. देखभालीअभावी येथे येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याच्या जागा आणि मुलांसाठी असलेली खेळणीही भंगार झाली आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या सुविधा प्रशासनाच्या ‘सुस्त’ कारभारामुळे धुळखात पडल्या आहेत.
हे उद्यान शहरातील नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. पण आज त्याच उद्यानाकडे कोणीही लक्ष देत नाही आहे. या गंभीर समस्येबाबत यापूर्वीही नगरपंचायत धानोरा यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी मागणी करण्यात आलेली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उद्यानाच्या देखभालीसाठी असलेल्या निधीचा विनियोग नेमका कुठे होतो, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
धानोरा उद्यानाचे नव्हे तर शहराचे अस्तित्व टिकवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप होण्याची गरज आहे. नगरपंचायत धानोरा यांनी आता पुढाकार घेऊन उद्यानाची देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
प्रशासनाने तातडीने ​मुलांसाठी सुरक्षित व चांगल्या दर्जाची खेळणी तातडीने उपलब्ध करून द्यावीत. ​स्वच्छता, बसण्याची व्यवस्था व पुरेशी प्रकाश व्यवस्था तातडीने सुधारावी. वाळलेल्या पालापाचोळ्याची विल्हेवाट लावून वृक्षसंपदेचे रक्षण करावे अशी मागणी जोर धरत आहे.

Don`t copy text!