देशाचा कायदा बदलणारी ‘मथुरा’ आजही उपेक्षित ; LIF कडून मदतीचा हात, पण प्रश्न अद्याप जिवंत

163

देशाचा कायदा बदलणारी ‘मथुरा’ आजही उपेक्षित ; LIF कडून मदतीचा हात, पण प्रश्न अद्याप जिवंत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : देशातील कोठडीतील लैंगिक अत्याचारविरोधी कायद्यात ऐतिहासिक बदल घडवून आणणाऱ्या ‘मथुरा’ प्रकरणाची आठवण आजही न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवते. मात्र, ज्यांच्या वेदनेतून हा बदल शक्य झाला, त्या ‘मथुरा’ आजही अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
सुमारे पाच दशकांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाने देशभरात संतापाची लाट उसळवली होती. व्यापक आंदोलनांनंतर कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. पण आज 72 वर्षीय ‘मथुरा’ महाराष्ट्रातील दुर्गम भागात मोडकळीस आलेल्या झोपडीत, पक्षाघाताशी झुंज देत, अन्न, आरोग्य आणि सुरक्षित निवाऱ्यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहत आहेत.
ही अत्यंत दयनीय स्थिती लक्षात घेत लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) पुढे सरसावले आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश गुप्ता यांच्या पुढाकारातून CSR अंतर्गत ‘मथुरा’ यांना ₹5 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या निधीतून सुरक्षित घर उभारणीसह जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्याचा उद्देश आहे.
याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी स्पष्ट शब्दांत खंत व्यक्त केली. “ज्यांच्या संघर्षामुळे देशाचा कायदा बदलला, त्यांनाच आज सन्मानाने जगण्यासाठी झगडावे लागत आहे, ही अत्यंत वेदनादायक बाब आहे,” असे ते म्हणाले. तसेच, ‘मथुरा’ यांना सन्मान, काळजी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी फाउंडेशन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ‘मथुरा’ यांना प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत देखील जोडण्यात आले असून, भविष्यात त्यांना स्थिर निवासाची सुविधा मिळणार आहे.
लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचा हा पुढाकार सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि समावेशक विकासाची बांधिलकी अधोरेखित करणारा ठरत आहे. तथापि, या घटनेमुळे एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायद्यात बदल घडवणाऱ्या पीडितेला न्याय आणि सन्मान खऱ्या अर्थाने कधी मिळणार?