• स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष; युवक व्यसनाच्या आहारी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली:- जिल्ह्यात एमडी (मेफेड्रोन) पावडरची विक्री जोमात सुरू असल्याची माहिती आहे़ या प्रकाराकडे पोलिस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. काही विक्रेत्यांना मिळणाऱ्या कथित आशीर्वादामुळेच हा धंदा गडचिरोली जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असल्याची खमंग चर्चा सुरु आहे. यासोबतच अवैध दारू व गांजाची विक्रीही वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
एमडी पावडरचा दर प्रतिग्राम सुमारे दीड ते दोन हजार इतका असल्याचे सांगितले जाते. एवढी महागडी नशा असूनही महाविद्यालयीन तरुणांमध्ये याचे सेवन वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. काही विद्यार्थी स्वतःच्या गरजांसाठी पैसे उभे करण्यासाठीच या पावडरच्या विक्रीत उतरल्याची माहिती आहे. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत अडकत असल्याची भीती व्यक्त होत आहे. एमडी पावडरचा पुरवठा शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातून नदीमार्गे होत असल्याचा संशय व्यक्त आहे. दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत तस्करांकडून बेधडकपणे या मालाची ने-आण केली जात आहे. मात्र, या गंभीर प्रकाराकडे स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष होत असून कारवाई करत नसल्याची टीका होत आहे. याशिवाय, गावागावात अवैध दारूचे अड्डे सुरू असून गांजाची विक्रीही खुलेआम होत आहे. दारूबंदी कायद्याचे उल्लंघन होत असतानाही उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. एकूणच एमडी पावडर, अवैध दारू व गांजाच्या वाढत्या विळख्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. ड्रग्समुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. गावागावात दारू आणि गांजा सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून या प्रकारांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.














