दारू तस्करीसाठी ‘महिंद्रा थार’चा वापर; १४.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

208

• एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, दि. २० : दारूबंदी लागू असलेल्या जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात एटापल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे १९ एप्रिल रोजी पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई अंमलात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी वाहनातून देशी व विदेशी दारूची तस्करी होणार असल्याची खात्री पटताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, एमएच ३२ एएस ७०९९ क्रमांकाचे वाहन नारानूर–ताडपल्ली मार्गे लांझीकडे येताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या २९ सिलबंद पेट्या तसेच बिअरची एक पेटी असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय तस्करीसाठी वापरण्यात आलेली ‘महिंद्रा थार’ ही चारचाकी (अंदाजे किंमत १२ लाख रुपये) देखील जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण १४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी मयूर विजय बालमवार (रा. गडचिरोली) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ), ८३ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तीक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात पार पडली. अवैध दारू व्यवसायाविरोधात पोलिसांचा कडक इशारा या कारवाईतून पुन्हा अधोरेखित झाला आहे.