• डॉ. सुजिता वाडीवे यांना न्याय देण्याची मागणी, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा इशारा
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २० : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती व वर्तनाबाबत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याने गडचिरोलीत मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तात्काळ, निष्पक्ष व सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (महिला आघाडी), जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी तथा तालुका आरोग्य अधिकारी, कुरखेडा डॉ. सुजिता वाडीवे यांनी डॉ. शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये भ्रष्टाचारासाठी दबाव टाकणे, विनयभंग, लैंगिक छळ, मानसिक छळ, जातीवाचक अपमान तसेच बनावट कागदपत्रांचा वापर यांसारख्या गंभीर बाबींचा समावेश आहे. या संदर्भात डॉ. वाडीवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, डॉ. वाडीवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील हिवताप नियंत्रणासाठी कीटकनाशके, औषधे व प्रयोगशाळा साहित्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. शिंदे यांनी विशिष्ट पुरवठादारांना लाभ मिळवून देण्यासाठी दबाव टाकत खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप आहे. यासोबतच वारंवार फोनद्वारे मानसिक छळ व धमक्या दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या सर्व प्रकरणात अधिकारांचा दुरुपयोग, पक्षपाती निर्णयप्रक्रिया व शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप असून, त्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या संदर्भात डॉ. वाडीवे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे संघटनेने सांगितले.
दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना (महिला आघाडी) यांनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याची मागणी केली आहे. दोष सिद्ध झाल्यास कठोर शिस्तभंग कारवाईसह कायदेशीर पावले उचलावीत व पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तसेच, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास हा मुद्दा राज्य मानवाधिकार आयोग, राज्य महिला आयोग व न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात येईल, तसेच जिल्हा परिषदेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
या प्रकरणी संघटनेच्या वतीने गृह विभागाकडे तक्रार निवेदन सादर करण्यात आले असून, यावेळी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, जाहेदा शेख, स्नेहा मेश्राम, भूषणा खेडेकर, राणी गोपशेट्टीवार यांसह पदाधिकारी उपस्थित होते.














