शेतात गांजाची शेती, २७ लाखांचा माल जप्त

41

• धानोरा पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीवर NDPS कायद्याच्या कठोर कलमांखाली गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
​ धानोरा दि.०६ :- धानोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आरमोरी तालुक्यातील परसवाडी(कोरेगाव) येथे शेतातच गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ४ मे रोजी या ठिकाणी धाड टाकून २७ लाख २५ हजार रुपये किमतीचा ५४.५ किलो गांजा हस्तगत केला. याप्रकरणी मोरेश्वर हिरामन उसेंडी (५८) या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेआहेत.

​पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे परसवाडी शिवारात हा छापा टाकला. यावेळी शेताची पाहणी केली असता गांजाची एकूण ३९ झाडे लावली असल्याचे दिसून आले. पंचांसमक्ष ही झाडे उपटून त्यांचे वजन केले असता ५४.५ किलो अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या मालाची बाजारभावानुसार किंमत २७ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शेतातील मातीचे नमुनेही पुराव्यासाठी जप्त केले आहेत.
​ सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले आणि वजन माप अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.
​या गंभीर प्रकरणी आरोपी मोरेश्वर उसेंडी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम ८ (क) आणि २० (ब) (ii) (क) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम टेंभुर्ने, पोलीस शिपाई श्रीकृष्ण कळाबे आणि प्रवीण राऊत हे करीत आहेत.
जप्त केलेला मुद्देमाल सील करून धानोरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात अशा प्रकारची अवैध लागवड करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.