Home Breaking News वैनगंगा पुलावरून अज्ञात महिलेची उडी; नदीत बुडून दुर्दैवी अंत

वैनगंगा पुलावरून अज्ञात महिलेची उडी; नदीत बुडून दुर्दैवी अंत

560

वैनगंगा पुलावरून अज्ञात महिलेची उडी; नदीत बुडून दुर्दैवी अंत

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. १९ :- गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवरील वैनगंगा नदीच्या पुलावर आज दुपारी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडाली. एका अज्ञात महिलेने पुलावरून थेट नदीत उडी घेतल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून सावली पोलिसांकडून तिच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास संबंधित महिला पुलावरून अचानक नदीत झेपावली. हा प्रकार पाहताच पुलावरील प्रवासी आणि नागरिकांनी आरडाओरड करून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी उपस्थित कोणालाही पोहता येत नसल्याने महिलेला तातडीची मदत मिळू शकली नाही. काही क्षणांतच ती नदीच्या पाण्यात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटना वैनगंगा पुलाच्या पलीकडील भागात घडली असून संबंधित परिसर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील प्रक्रियेसाठी मूल येथील सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. सध्या मृतदेह शवागारात ठेवण्यात आला असून ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार मृत महिलेचे अंदाजे वय ४० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असून तिचा वर्ण सावळा-काळपट आहे. महिलेने लालसर-जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. मात्र तिची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

दरम्यान, महिलेच्या नातेवाईकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून ओळख पटल्यावर त्यांच्या संमतीने शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती सावली पोलिसांनी दिली.

Don`t copy text!