• ग्रामीण क्रिकेट प्रतिभेला मोठे व्यासपीठ
लोकवृत्त न्यूज गडचिरोली, मे 2026 : हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) 2026 स्पर्धेची उत्साहपूर्ण वातावरणात आणि भव्य यशासह सांगता झाली. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देत क्रीडाभावना, एकात्मता आणि स्थानिक प्रतिभेला चालना देणाऱ्या या स्पर्धेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 5 मे रोजी पार पडला होता, तर अधिकृत सामने 7 मेपासून सुरू झाले होते. 15 मे रोजी झालेल्या अत्यंत रोमांचक अंतिम सामन्यात BCCC आलदंडी संघाने टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाचा अवघ्या 3 धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
विजेत्या BCCC आलदंडी संघाला ट्रॉफीसह ₹75 हजारांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. उपविजेत्या टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाला ₹50 हजार, तिसरे स्थान पटकावणाऱ्या हेडरी हरिकेन्स संघाला ₹30 हजार, तर चौथ्या क्रमांकावरील नेंदर इलेव्हन हिरोज संघाला ₹20 हजारांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या संघांनाही प्रत्येकी ₹10 हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल हेडरी हरिकेन्सचे प्रसंजीत सरकार यांना “मॅन ऑफ द सिरीज” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना ₹10 हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक, अष्टपैलू खेळाडू, युवा खेळाडू आणि सामनावीर अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरणही प्रत्येकी ₹3 हजारांच्या रोख पारितोषिकासह करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी आयोजन समिती आणि लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांची प्रतिभा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे गावातील मान्यवर, पोलीस प्रशासन, स्वयंसेवक, CSR टीम, लॉयड्सचे कर्मचारी आणि ग्रामस्थ यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. ग्रामीण क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा देणारा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











