Home Breaking News खासदार डॉ. नामदेव किरसान यांची प्रकृती खालावली; नागपूरात उपचार सुरू

खासदार डॉ. नामदेव किरसान यांची प्रकृती खालावली; नागपूरात उपचार सुरू

317
  •  राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते, समर्थक तसेच राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून भेटी देऊन प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही रुग्णालयात भेट देत खासदार किरसान यांच्या प्रकृतीची आस्थेपूर्वक चौकशी केली. तसेच ते लवकर बरे होऊन पुन्हा पूर्वीप्रमाणे जनसेवेत सक्रिय व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली.
दरम्यान, २६ मे रोजी गडचिरोली येथे आयोजित काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सोहळ्यासह शेतकरी मेळाव्यास खासदार डॉ. किरसान उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले असून कार्यक्रमात त्यांच्या प्रकृतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
मागील काही काळापासून खासदार किरसान यांच्या प्रकृतीबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. जिल्ह्याच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने त्यांच्या आरोग्याकडे समर्थकांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे.
आदिवासी, शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रश्न संसदेत सातत्याने मांडणारे खासदार डॉ. नामदेव किरसान हे जनतेशी जोडलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत असून ते लवकर पूर्णपणे बरे व्हावेत, यासाठी जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Don`t copy text!